गोवा विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. याकाळात अनेक पक्षाच्या नेत्यानी व आमदारांनी पक्षांतर केले आहे. हे सुरू असताना काँग्रेसने मात्र राज्याच्या राजकारणात सतत पक्षांतर करण्याची प्रथा बंद करण्याची जाहीर शपथ घेतली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे दोन महिने बाकी असताना, गोवा काँग्रेसने राज्यातील जनतेला दिलेल्या व्यापक आश्वासनांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये “गोव्यातील पक्षांतर संपुष्टात आणण्याची” प्रतिज्ञा आहे. पक्षाने रविवारी आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, “आम्ही पक्षांतर करणाऱ्यांना काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करू देणार नाही.”
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका विद्यमान आमदाराने राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी हे वचन आले आहे. गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, “पक्षांतर हे गोव्याच्या राजकारणाचा एक भाग आहे. मात्र, मतदारांनी तुम्हाला एका विशिष्ट पक्षाच्या चिन्हावर निवडून दिलेले असताना, केवळ सत्तेसाठी पक्ष बदलणे योग्य नाही. त्यामुळे गोव्यात पहिल्यांदाच काँग्रेसने हा धाडसी निर्णय घेतला आहे.” अनेक राज्यात निवडणुकांपूर्वी काही प्रमाणात पक्षांतर होते, मात्र गोव्यात पक्षांतराचे प्रमाण बाकीच्या राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथील मतदारसंघ लहान आहेत व गोव्यामध्ये राजकीय पक्षांपेक्षा नेत्यांचे वर्चस्व जास्त आहे.