महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याबद्दल केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघुउद्योगमंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अखेर अटक करण्यात आली. राणे यांच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटले, ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले, भाजपचेही कार्यकर्ते भिडले. असे राजकीय धुमशान सुरू असतानाच रात्री उशिरा महाड न्यायालयाने राणे यांची सशर्त जामिनावर सुटकाही केली. असा गुन्हा पुन्हा करणार नाही, अशी लेखी हमी राणे यांनी न्यायालयास दिली. याशिवाय इतरही अटी घालण्यात आल्या आहेत.
राणे यांच्या मुख्यमंत्री विरोधी वक्तव्यामागे कट असल्याचा आरोप करीत सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र राणेंच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शेख भाऊसो पाटील यांनी राणे यांना न्यायालयीन कोठडी दिली. पाठोपाठ जामीनही मंजूर झाला. सोमवारी रायगडमधील महाड येथील सभेमध्ये सायंकाळी 7 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात ना. राणे यांनी वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी ना. राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार केल्याने शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर अचानक प्रकाशझोतात आले आहेत. बडगुजर हे नाशिकमधील आक्रमक आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. सन 2007 पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते.
तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.
अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृह नेतेपद सोपविले. पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले. 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली.