लष्कर भरती पेपरफुटी प्रकरणातील आरोपींनी उमेदवारांची मूळ कागदपत्रे ठेवून घेतली होती. आरोपींकडून ती कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. उमेद्वारांकडे परीक्षा पास झाल्यानंतर दोन ते तीन लाख रुपये देण्याचे मान्य करवून घेतले. तोपर्यंत उमेद्वारांची मूळ शैक्षणिक व अन्य कागदपत्रे आरोपींनी स्वत:कडे ठेवून घेतल्याची माहिती विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी न्यायालयात दिली.
त्यानुसार विशेष न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयाने गुन्ह्यातील तिघांचा जणांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामध्ये दोन माजी सैनिकांसह एका स्वयंपाक्याचा समावेश आहे. महेंद्र चंद्रभान सोनवणे (वय 37, रा. दिघी. मुळ रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), अलीअख्तर अब्दुलअली खान (वय 47), आजाद लालमहमंद खान (वय 37, रा. गणेशनगर, बोपखेल. मुळ रा. खंडावाल, पो. महाना, जि. गाझीपुर, राज्य. उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहे.
आरोपींसह त्यांच्या अन्य एका साथीदारांला सैन्याची भरती परिक्षा या कार्यपध्दतीबाबत माहिती असून त्यांकडून पश्चिम महाराष्ट्रात रिक्रुटमेंट अकादमी चालविण्यात येत आहे. तर, काहींना त्यांनी फ्रॅंचायजी दिलेल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलांच्या मनामध्ये असलेल्या देशसेवेचा फायदा घेऊन त्यांना परिक्षेचे पेपर परिक्षेच्या एक दिवसापूर्वी देतो असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख फी आकारत असल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.