अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग आलाय. तालिबानने सत्ता स्थापन करण्यासाठी आणि नवीन मंत्रीमंडळ बनवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. सर्व सहकारी गटांना एकत्र घेऊन तीन दिवसांनंतर तालिबानकडून सत्ता स्थापनेसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
तालिबानचे सांस्कृतिक आयोगाचे सदस्य बिलाल करीमीने संघटनेचा प्रमुख नेता हिबतुल्लाह अखुंदजादाच्या नेतृत्वाखाली यासंदर्भातील चर्चा होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर सरकारच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी तालिबानचा प्रसिद्ध नेता मुल्ला अब्दुल गनी बरदारवर सोपवण्यात येणार आहे.
नवीन सरकारमध्ये पवित्र आणि सुशिक्षित लोकांचा समावेश असे आणि मागील २० वर्षांपासून सरकारमध्ये असणाऱ्यांना संधी दिली जाणार नाही, अशी माहिती कतारमध्ये तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे उपप्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजईने दिलीय. विशेष म्हणजे सरकारमध्ये महिलांनाही स्थान दिलं जाईल असंही अब्बास म्हणालेत. सरकार हे अखुंदजादाच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे संकेत तालिबानने दिलेत.