संपूर्ण देशावर सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट आहे. सर्वसामान्य जनतेने कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सरकारने घातलेले नियम स्वीकारले यामुळे अनेक संकटाना देखील जनतेला सामोरे जावे लागले असल्याचे पहायला मिळाले. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारधील नेते, मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना काळात काळजी घेण्याचे आवाहन जनतेला करत आहे.
तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. परंतु राजकीय कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीमुळे महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडत असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमात आणि मेळाव्यात मोठी गर्दी उसळली. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः मंचावर होते. यावर आज शरद पवार यांनी स्पष्टीकरण देवून त्यांनी इथून पुढे पवार यांनी गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं जाहीर केले आहे.
शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले कि, जुन्नरला ज्यांनी कार्यक्रमांनी घेतला त्यांच्याकडून आधी सर्व माहिती घेतली होती. सरकारची परवानगी घेतली का? पोलीसांची परवानगी घेतली का? आरोग्य खात्याची परवानगी घेतली का? खुर्च्यांमध्ये अंतर ठेवले का? आदी माहिती त्यांच्याकडून घेतली होती.
तसेच त्यांनी होकार दिल्यानंतरच मी कार्यक्रमाला गेलो. पण तिथे गेल्यावर व्यासपीठावर अतंर होतं. पण समोर लोक शेजारीशेजारी बसले होते. ते योग्य नव्हतं, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी गर्दी न करण्याबाबतचं केलेलं आवाहन योग्यच आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक जमतील अशा ठिकाणी मी सहसा जाणार नाही. गेलो तरी हॉलमधील कार्यक्रमाला जाणार. तिथे खुर्च्यांमधील अंतर असेल तरच जाणार’ असं त्यांनी जाहीर केले आहे.