भटकंतीची आवड असणाऱ्यांना सतत नवीन पर्यटन स्थळांचा शोध घ्यावा लागतो. त्यांच्यासाठी पेट्रा या ऐतिहासिक शहराची भेट ‘मस्ट’ म्हटली पाहिजे. जगात जी सात आश्चर्ये मानली जातात त्यात या ठिकाणाचा समावेश आहे. जॉर्डन देशातील हे ऐतिहासिक नगर शिला खोदुन वसविले गेले आहे. लाल रंगांचे अवाढव्य खडक फोडून त्यातच प्रचंड इमारती बांधल्या गेल्या आहेत. लाल रंगाच्या खडकात कोरल्याने या नगरला ‘रोझ सिटी’ असेही म्हटले जाते.
इसवीसन पूर्व ६ व्या शतकात नावातीयान साम्राज्याने पेट्रा नगर राजधानी म्हणून स्थापन केले. मात्र प्रत्यक्षात या नगराची बांधणी इसवी सन पूर्व १२०० पर्यंत सुरु होती. आज हे नगर अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. होर नावाच्या पहाडाच्या उतारावर उभारल्या गेलेल्या पेट्राला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे.
बीबीसीने प्रत्येक भटक्याने मरण्यापूर्वी पाहायला हवीत अश्या ४० स्थळांची यादी जाहीर केली होती त्यात पेट्राचा समावेश आहे. १९२९ मध्ये उत्खनन करताना हे नगर सापडले. इंडियाना जोन्स आणि लास्ट क्रुसेड चित्रपटांचे शुटींग येथे झाल्याने हे नगर जगात प्रसिद्ध झाले. कबरी, स्मारके, पवित्र मंदिरे अश्या अनेक जागा येथे आहेत. येथे २६५ चौ.मीटरचे पुरातत्व पार्क सुद्धा आहे आणि ५ ते ८ हजार प्रेक्षक बसू शकतील असे विशाल थिएटरही आहे.
या शहरात वाहन बंदी आहे. मुळात येथे जाण्यासाठीचा १ किमीचा मार्ग अतिशय अरुंद दरीतून जातो. त्यामुळे येथे जायचे तर गाढव, घोडा, उंटावरून जावे लागते. मार्च ते मे आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ येथे भेट देण्यासाठी उत्तम मानला जातो.