प्रचंड कर्जबाजारी असलेल्या एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीची विक्री प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. ही विमान कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीत अनेक खासगी कंपन्या सहभागी असून सर्वात मोठा दावेदार म्हणून टाटा समूहाकडे पाहिले जात आहे. टाटा कंपनीने एअर इंडिया खरेदी करण्यास पुढे आले आहे. टाटा समूहाकडे सध्या एअर एशिया आणि विस्तारा एअरलाईन मध्ये समभाग आहेत.
कर्जात बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी दोन कंपन्यांनी बोली लावली आहे. कंपनीसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये स्पाइसजेटचे प्रमोटर अजय सिंह आणि टाटा ग्रुप यांचा समावेश आहे. एअर इंडियावर खूप मोठे कर्ज आहे. हे सुमारे 43,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापैकी 22,000 कोटी रुपये एअर इंडिया एसेट होल्डिंग लिमिटेड (AIAHL) ला हस्तांतरित केले जातील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमान कंपनीचे कर्ज 43,000 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे आणि ही सर्व कर्जे सरकारी हमी अंतर्गत आहेत. जेव्हा जव्हा सरकार ते नवीन मालकाला देईल तेव्हा सरकार हे कर्ज फेडेल.
विशेष म्हणजे, केंद्र सरकार एअर इंडिया आणि त्याची कमी किमतीची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसमधील शंभर टक्के हिस्सा विकण्याची तयारी करत आहे. याशिवाय, ग्राउंड होल्डिंग कंपनी एअर इंडिया SATS एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (AISATS) मधील 50 टक्के भागविक्री करणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील एअर इंडियाची इमारत, दिल्लीतील एअरलाइन्स हाऊससह इतर मालमत्तांचाही या विक्रीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
मलेशियन एअरलाइन्स कंपनी एअर एशिया बेरहाद आणि टाटा सन्स यांच्या संयुक्त उपक्रमातून एअर एशियाची २०१३ मध्ये सुरुवात झाली. या कंपनीमध्ये टाटा सन्सची ५१ टक्के हिस्सेदारी होती, तर एअर एशिया बेरहादची ४९ टक्के हिस्सेदारी होती. तथापि, गेल्या वर्षी एअर एशिया बेरहादने आपला ३२.६७ टक्के हिस्सा टाटा सन्सला २७६ कोटी रुपयांना विकली. आता कंपनीतील टाटा सन्सचा हिस्सा ८३.६७ टक्के पर्यंत वाढला आहे.
विस्तारा एअरलाइन टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. यामध्ये टाटा सन्सचा ५१ टक्के हिस्सा आहे, तर सिंगापूर एअरलाइन्सचा ४९ टक्के हिस्सा आहे. मात्र ही कंपनी टाटा एसआयए एअरलाइन्स लिमिटेड म्हणून नोंदणीकृत आहे. विस्ताराकडे ४७ विमाने असून ती दररोज २०० हून अधिक उड्डाणे उडवते.
एअर इंडिया अजूनही सरकारच्या ताब्यात आहे, परंतु सुमारे ७० वर्षांपूर्वी ही विमानसेवा जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा हवाई सेवा सुरू केली, त्यानंतर ती टाटा एअरलाइन्स झाली आणि २९ जुलै १९४६ रोजी ती पब्लिक लिमिटेड कंपनी बनली. तथापि, पुढे १९५३ मध्ये सरकारने टाटा एअरलाईन्स ताब्यात घेतली. आता पुन्हा एकदा टाटा समूहाची उपकंपनी टाटा सन्सने एअर इंडिया खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले आहे.