नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तुटल्यात जमा आहे. शिवसेना सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. शिवसेनेच्या बैठकीत खासदार कृपाल तुमाने यांनी भूमिका स्पष्ट केली. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांवर शिवसेना पोटनिवडणूक लढवणार आहे. जिल्हा परिषदेच्या 12 सर्कलमध्ये शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत.
आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर न दिल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळेल.
शिवसेनेच्या प्रस्तावाला उत्तर नाही
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव स्थानिक शिवसेनेने राष्ट्रवादीला दिला होता. मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला कोणतंही उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 61 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.
“म्हणून शिवसेना स्वबळावर लढणार”
शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी जून महिन्यातच दिली होती. “कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून सेना स्वबळावर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे” असं आशिष जैसवाल यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असं चित्र पाहायला मिळणार आहे.
नागपुरातच पटोलेंच्या घोषणेला बगल
दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेनंतरही नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीने हातात हात धरला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष एकत्र पोटनिवडणूक लढवण्याबाबत शिक्कामोर्तब झालं. दोन्ही पक्षात जागावाटपासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे.