राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांच्यावर पक्षाअंतर्गत काही कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गीतेंच्या वक्तव्यावर थेट निशाणा साधला आहे. अशा प्रकारची वक्तव्य कुणी करत असेल, तर आम्ही दखल घेत नाही. मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवले होते. आम्हा सगळ्यांचे शरद पवार हे नेते आहेत. बाळासाहेब आणि पवार सुद्धा एकत्रित व्यासपीठावर यायचे हे सांगतानाच संजय राऊत यांनी गीतेंचे वक्तव्य पक्षशिस्तीत बसणारे नसल्याचेही म्हटले आहे.
पक्षशिस्तीत अशा प्रकारची वक्तव्ये बसत नाहीत. पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही. त्यांच्या भावना असतील, पण महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्याविषयी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. कारवाई काय करायची ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, असे म्हणत संजय राऊत यांनी गीतेंच्या वक्तव्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यामुळे आता या वक्तव्यावरुन गीतेंना कुठल्या पक्षांतर्गत कारवाईला सामोरे जावे लागू शकते का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान राऊत कुटुंबियांना पीएमसी बॅंक घोटाळ्यातील पैसे प्राप्त झाल्याचा आरोप करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट न्यायालयात खेचण्याची तयारी संजय राऊत यांनी केली आहे. आज सामना वृत्तपत्रात चंद्रकांत पाटील यांचे याबाबतचे पत्र छापून आले आहे. पण पुढच्या चार दिवसात चंद्रकांत पाटील यांना माझी कायदेशीर नोटीस जाईल. मी नोकरदार माणूस आहे, मध्यमर्गीय. घोटाळे करत बसलो असतो, तर राजकारणात टिकलो नसतो असे म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचे आरोप फेटाळले आहेत.
शिवाय लोक शंभर कोटींचा दावा करतात, पन्नास कोटींचा करतात. पण यांची एवढी लायकी नाही. मी यांच्यावर सव्वा रुपये अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे म्हणत चंद्रकांत पाटील यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.