पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली आहे. सध्या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र आल्यानंतर महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार असल्याने राजकीय वर्तुळात उलथापालथ होण्याची चिन्हे देखील वेग घेऊ लागले आहेत.
खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी सक्रिय होत आहेत. तर, भाजपचा झेंडा महापालिकेवर पुन्हा एकदा फडकवण्याचा चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार व भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे हे रणनीती आखत आहेत. आता भाजपने शिवसेनेचा वचपा काढण्यासह महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे महाविकास आघाडीला येत्या निवडणुकांमध्ये धोबीपछाड करण्यासाठी लक्ष्मण जगताप यांची ही यशस्वी खेळी असल्याचं बोललं जात आहे.