या महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच भागात चांगला पाऊस झाला. मराठवाड्यासह नाशिक, उत्तर महाराष्ट्र या भागात गंभीर पूरस्थिती देखील निर्माण झाली होती. तर गेल्या दोन वर्षात निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाचा राज्याला तडाखा बसला आहे. याचा सर्वाधिक फटका कोकण आणि गुजरातला बसला होता. आता आणखी देशावर आणखी एका चक्रीवादळाचं संकट राज्यावर घोंघावत आहे.
पुढच्या 5 तासात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून चक्रीवादळ (cyclonic storm) होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होईल. तसेच आगामी ५ तासात याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढील २४ तासांत ते ओडिशा
किनाऱ्याजवळ सरकेल. परिणामी, याचा प्रभाव म्हणून राज्यात पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: रविवारपासून पावसाचा जोर वाढेल. यंदा मान्सूनच्या परतीच्या प्रवासालाही विलंब झाल्याचे होसाळीकर यांनी सांगितले. राजस्थानमधून पाऊस आपला परतीचा प्रवास विलंबाने सुरू करणार आहे. जवळपास ७ ते ८ ऑक्टोबरच्या आसपास मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल, असेही त्यांनी सांगितले.