मागील काही दिवसांपासून राजकीय क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या कारणावरून पत्र लिहिण्याचा ट्रेंड सुरु झाला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र हायस्पीड रेल्वेसंदर्भात असून यामध्ये दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव मोदींना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
नाशिक-मुंबई, मुंबई-पुणे-हैद्राबाद या हायस्पीड रेल्वेसंदर्भात हे पत्र असून या दोन प्रस्तावांचा उल्लेख रेल्वे मंत्रालयानेही केला होता. ‘नागपूर-नाशिक-मुंबई ही एक बुलेट ट्रेन करण्यात यावी. तसेच समृद्धी महामार्गाला नांदेडवरुन जालना असा मार्गही जोडला जाणार आहे, तोच मार्ग औरंगाबाद पुणे मुंबई असा करण्यात यावा आणि नांदेडवरुन तो मार्ग पुढे हैद्राबादला जोडला जावा आणि हैद्राबाद नागपूर मुंबई अशी एक बुलेट ट्रेन करण्यात यावी’, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या पत्रात पूर्वीचा गुजरात- मुंबई जोडणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गाविषयी कोणताही उल्लेख करण्यात आलेला नसून रेल्वे मंत्रालयाने लवकरात लवकर याचा विचार करावा जेणेकरुन महाराष्ट्राच्या विकासात हातभार लागेल तसेच हैद्राबादचे मार्केट आणि मुंबईचे मार्केट दोन्ही जोडता येईल असा प्रस्ताव या पत्राद्वारे मांडण्यात आलेला आहे.