राज्याचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू या प्रकरणी तुरुंगात आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वाझेंवर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे बरे होईपर्यंत त्यांना घरी तात्पुरते नजर कैदेत ठेवण्यात यावे अशी मागणी वाझेंकडून करण्यात आली आहे. परंतु वाझेंच्या या याचिकेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने विरोध दर्शविला आहे. वाझेंची नजरकैदेची याचिका मंजूर झाल्यास ते फरार होऊ शकतात, अशी भीती एनआयएने न्यायालयात व्यक्त केली आहे.
वाझेंनी विशेष न्यायालयाकडे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरती नजरकैद देण्याची परवानगी मागितली होती. तसेच नजरकैदेत असताना सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत त्यांच्या घरी त्यांच्या वकिलाशी वैयक्तिक सल्लामसलत करण्याची परवानगीही त्यांनी मागितली होती. वाझेंनी दाखल केलेल्या याचिकेत वाझेंना तळोजा कारागृहात परत पाठवण्यात येऊ नये. कारण तिथे त्यांना पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मिळणार नाही आणि अधिक संसर्ग होऊ शकतो. असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, एनआयएने वाझेंना नजरकैदेस मंजुरी देण्यास विरोध केला आहे आणि ते कायद्याच्या आणि न्यायाच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. तसेच तळोजा मध्यवर्ती कारागृहाशी संलग्न मुंबईतील रुग्णालये वाझेंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व सक्षम सुविधांसह पूर्णपणे सक्षम आहेत. तसेच वाझेंचा अर्ज गृहितकांवर आणि अनुमानांवर आधारित होता. त्यांनी खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार, याच्या अचूक तारखेबद्दल याचिकेत कोणताच उल्लेख केलेला नाही, असेही एनआयएने म्हंटले आहे.