मुंबई आणि खड्डे हे समीकरण प्रत्येक पावसाळ्यात पाहायला मिळतं. खड्ड्यांचं खापर दरवर्षी मुंबई महानगर पालिकेवर फोडलं जातं, आणि महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यामुळे थेट शिवसेनेवर टीका होते. हे चित्र यंदाही पाहायला मिळतं आहे. मात्र, सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरुन अधिकाऱ्यांची शाळा घेतली. आणि खड्डे का पडले याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला. हे सगळं माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर झालं, आणि ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. मात्र, आता या क्लिपवरुन राजकारण सुरु झालं आहे, कारण, निलेश राणेंनी ट्विट करुन याला महापौरांचा ड्रामा म्हटलं आहे.
महापौरांना यंदाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड द्या- निलेश राणे
दरम्यान, महापौरांकडून अधिकाऱ्यांची शाळा घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. हा व्हिडीओ भाजप नेते निलेश राणे यांनीही ट्विट केला आणि महापौर किती सहज अभिनय करतात असा टोला लगावला.
ते म्हणाले की, आम्ही मराठी सिनेसृष्टीत हा व्हिडीओ पाठवणार आहोत, जेणेकरून यंदाचा 2021 वर्षाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड हा आमच्या महापौर मॅडम ना मिळालाच पाहिजे. इतकी सहज एक्टिंग करणे अशक्य आहे, दिग्गज कलाकारांना सुद्धा अशी एक्टिंग जमणार नाही. एकूणच, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या या पाहणी अभियानाला निलेश राणेंनी पाहणी अभिनय ठरवलं आणि त्यांना अभिनयाचा अवॉर्ड देण्याची मागणी केली.