माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातली नवीन बातमी समोर येत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात आता महानगर दंडाधिकारी न्यायालयानं समन्स जारी केलेत. अनिल देशमुख यांना 16 नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने बजावलेल्या समन्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आलं, असे निरीक्षण अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलं आहे. त्यानंतर त्यांना समन्स बजावलेत.
मनी लाँड्रिंगप्रकरणी समन्स बजावूनही ईडीच्या चौकशीला हजर न राहिल्याबद्दल ही कारवाई न्यायालयाकडून सुरु करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी देशमुख यांच्याविरोधात शुक्रवारी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.
भारतीय दंडसंहिता 174 अंतर्गत न्यायालयानं देशमुख यांच्यावर ही कारवाई सुरू केली आहे. ईडीने देशमुख यांच्याविरोधात केलेल्या अर्जावर न्यायदंडाधिकारी आर. एम. नेर्लीकर यांच्यापुढे सुनावणी होती. ईडीने बजावलेले समन्स आरोपी, त्यांची मुलगी किंवा त्यांच्या वतीने वकिलांनी घेतले.
अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आणि खंडणी वसुलीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीबीआयकडूनही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ईडीनं याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. ईडीनं देशमुख यांना आतापर्यंत पाचवेळा समन्स बजावले आहे. मात्र अनिल देशमुख हे अद्याप एकदाही चौकशीसाठी हजर राहिलेले नाही. हे निदर्शनात आल्यानंतर ईडीनं देशमुख यांच्या विरोधात दंडाधिकारी न्यायालयात दावा दाखल केला आहे.