आपल्या राज्यात आजपासून मंदिरे सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कोरोनाचे संकट गेलेले नाही. दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी साधताना हा इशारा दिला आहे. दसरा आणि दिवाळी नंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वाटत आहे. या पार्श्वभूमीवर आपण विशेष लसीकरण करत आहोत. जेणेकरून आरोग्यावर जास्त गंभीर परिणाम होणार नाही, असं टोपे यांनी सांगितलं. मुस्लिम बांधवांनी बऱ्यापैकी लसीकरण केलं आहे. मात्र मालेगाव सारख्या काही ठराविक ठिकाणी लसीकरण कमी झाल्याचे देखील दिसून आले आहे. मात्र त्या ठिकाणी देखील धर्मगुरू, मौलवी, सामाजिक संस्था यांच सहकार्य घेऊन लसीकरण केले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
उद्यापासून ‘मिशन कवच कुंडल’
वर्ष दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे खुली झाली आहेत. मंदिराबाबतची नियमावली सर्वांनी पाळावी. मंदिरांना देखील सूचना करण्यात आल्या आहेत, असं सांगतानाच उद्यापासून राज्यात मिशन कवच कुंडल सुरू करण्यात येणार आहे. 8 ऑक्टोबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत हे ‘मिशन कवच कुंडल’ सुरू राहणार आहे.
15 ऑक्टोबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचं टार्गेट केंद्राने दिले आहे. त्यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असून राज्यात कुठेही लस कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात दररोज 15 लाख लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या आपल्याकडे एक कोटी लसी उपलब्ध आहेत. तसेच यावेळी पहिल्या डोसला आपण प्राधान्य देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.