कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशाने अल्पावधीत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार केला. हे कार्य देशाची क्षमता व समस्त भारतीयांच्या बंधुभाव आणि एकतेचे प्रतिक आहे. पीएम केअर फंडाच्या मदतीने देशात 1 हजार 150 ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
पीएम केअर फंडातर्फे उभारण्यात आलेल्या देशभरातील 35 ऑक्सिजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्याचा मुख्य सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे झाला. अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील प्रकल्पाचाही त्यात समावेश असून, यानिमित्ताने स्थानिक स्तरावर आयोजित कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा,आमदार प्रताप अडसड, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोना संकटकाळातील अडचणींवर अथक प्रयत्नांतून केलेली मात, विविध सुविधांची वेगाने निर्मिती आदी बाबींवर प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. ते म्हणाले की, कोरोना संकटकाळात देशाने अत्यंत थोड्या काळात गतीने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उभारल्या. रूग्णालये, प्रयोगशाळा, ऑक्सिजन निर्मिती, लसीकरण मोहिम अशा कितीतरी गोष्टींना चालना देण्यात आली.