सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही.
त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र तथा भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘चिपी विमानतळासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे शिवसेना धावत होती. मात्र, जेव्हा उद्घाटनाची वेळ आली तेव्हा साधे त्यांना आमंत्रितही केले नाही. हीच ती उद्धव सेना आहे. वेळेचे महात्म्य यालाच म्हणतात. ‘हिसाब तो जरूर होगा’ असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.