उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांविरोधातील जुलूमाविरोधात महाविकासआघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला असलेला व्यापाऱ्यांचा विरोध अखेर मावळला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी रविवारी आम्ही दुकाने सुरुच ठेवणार, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आज व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. व्यापारी महासंघाकडून सोमवारी तशी माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील 90 टक्के व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवा, त्यानंतर उघडली तरी चालतील, असे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. त्यामुळे आम्ही दुपारी तीन वाजेनंतर दुकाने उघडू, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी दिली आहे.
लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद राहणार आहेत. याअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात धावणाऱ्या बसेस दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे सुमारे 1400 बसेस आज बंद राहणार आहेत, असा पीएमपीएल प्रशासनाने निर्णय घेतला आहे.