मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळला. महानगरदंडाधिकारी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी घेऊन निर्णय देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले. पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्जचा वापर यासंबंधी आर्यन खानच्या अटकेमुळे चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय देशात अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडत असून यासंबंधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली आहे. उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी भारतीय कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगताना पाश्चिमात्य देशही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास करत होते, असे मोहन भागवत यांनी सांगितले. तसेच ही मूल्य नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप केला. पाश्चिमात्य देशांनी लोकांना आपले गुलाम बनवण्यासाठी चीनमध्ये ओपियम पाठवले. त्याच्या आहारी तरुण गेले आणि चीनवर पाश्चिमात्य देशांनी राज्य केले. हेच आपल्या देशातही सुरु आहे. जेव्हा तुम्ही ड्रग्ज प्रकरणे पाहता आणि ते कुठून येतात हे पाहिले तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा फायदा कोणाला होत आहे हे तुम्हाला समजेल, असे मोहन भागवत म्हणाले आहेत.