भारतातील वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या आणि दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली पोलिसानी अटक केली आहे. सणासुदीच्या काळात दिल्ली आणि जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा त्याचा इरादा यामुळे फसला आहे. मात्र गेल्या 15 वर्षांपासून हा पाकिस्तानी दहशतवादी भारतात कसा राहू शकला, याचं उत्तर जेव्हा पोलिसाना मिळालं, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.
बिहारमधून बनवलं बोगस ओळखपत्र
दिल्लीतून अटक करण्यात आलेला कुख्यात दहशतवादी अशरफ अली हा बिहारचा रहिवासी असल्याची बतावणी करत होता. त्याच्याकडे बिहारचा रहिवासी असल्याचं ओळखपत्रही होतं. शिवाय दिल्लीचा रहिवासी असल्याचं आणखी एक बोगस ओळखपत्रही त्यानं बनवून घेतलं होतं. दिल्लीत झालेल्या या गौप्यस्फोटानंतर बिहार पोलिसांनाही धक्का बसला असून आपल्या राज्यात पाकिस्तानी दहशतवाद्याला ओळखपत्र कसं मिळालं, याचा तपास ते करत आहेत.