राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोनही नेते मिळून संगनमताने शेतकऱ्यांना टोपी घालण्याच्या प्रयत्न करताहेत अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. साखर कारखानदार यांनी काढलेल्या कर्जाचे संकट दिसते, पण शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्जाचे संकट या नेत्यांना दिसत नाही का? असा सवाल देखील यावेळी राजू शेट्टी यांनी केला.
उद्या म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 20 वी ऊस परिषद होणार आहे. राजू शेट्टी यांनी आजरा या ठिकाणी या ऊस परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना राजू शेट्टी यांनी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
साखर कारखान्याने एफआरपी एकरकमी दिल्यास सूतगिरणी प्रमाणे बंद पडतील, अशा पद्धतीची वक्तव्य काही नेते करत आहेत. पण ते शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्जाबाबत बोलण्यास तयार नाहीत. एफआरपीचे केंद्र सरकारला तुकडे करायचे आहेत. तर शरद पवार यांचे देखील त्याला समर्थन दिसत आहे. तसेच शेतकरी विरोधी कायदे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांना टोपी घालण्याबाबत एकमत झाल्याची टीका यावेळी शेट्टी यांनी केली.