शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेला आश्वासन
नागपूर: शालेय शिक्षण विभागाचा जीआर असूनही सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांना अर्जित रजेच्या रोखीकरणाचा लाभ मिळत नाही. याबाबत विधिमंडळात मुद्दा उपस्थित करण्यात यावा यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक आमदार विक्रम काळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी शिक्षकांना अर्जित रजेचे रोखीकरण मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ते दि १४ रोजी नागपूर येथे आयोजित सभेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981, नियम 73 नुसार राज्यातील सर्व शासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी, तसेच खासगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जमा असलेल्या रजांपैकी 300 रजापर्यंतचे रोखीकरण सेवानिवृत्तिनंतर देण्याची तरतूद आहे. तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 248 नुसार दिलेल्या अधिकाराचा वापर करून शासनाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना अर्जित रजेच्या रोखीकरणाचा आर्थिक लाभ 1 फेब्रुवारी 2001 देण्याचा निर्णय घेतला. मात्र जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक जिल्हा परिषदेचे कर्मचारी असूनही त्यांना याचा लाभ मिळत नाही. तशी तरतूदही शासनाने केली नाही.
शालेय शिक्षण विभागाच्या 9 एप्रिल 2001 च्या जीआर नुसार खासगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजेच्या रोखिकरणाचा लाभ देण्याची तरतूद असतानाही त्यांना देण्यात येत नाही. हा शिक्षकांवर अन्याय आहे. राज्यातील 261730 जिल्हा परिषद शिक्षक तर 283799 खासगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अर्जित रजेच्या रोखीकरण लाभापासून वंचित आहेत. याकडे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे लक्ष वेधून सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात शासन, प्रशासनाशी चर्चा करण्याचे, प्रसंगी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले.
आमदार काळे यांना दिलेल्या निवेदनातील खालील मुद्दे
1) आक्टोंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी करण्यात यावे.
2) 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळांना सोयी सुविधा पुरविण्यात ग्राम पंचायतीकडून होत असलेला चालढकलपणा.
3) सरसकटपणे प्राथमिक शिक्षकांच्या केंद्र प्रमुख पदावर नियुक्त्या करण्यात याव्या.
4) जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी. 5) सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे सर्व आर्थिक लाभ वेळेवर मिळण्यात यावे. इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष परशराम गोंडाणे, जिल्हाध्यक्ष प्रबोध धोंगडे, सुनील वंजारी, राजू नवनागे, धनराज राऊळकर, नरेंद्र गजभिये तथा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.