नागरिकत्व कायद्यात सुधारणा व्हावी; मिलिंद देवरा
बांगलादेशमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेला हिंसाचार आणि तोडफोड या घटनांमुळे भारतातून त्यावर आता संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेमध्ये ४ जण ठार झाले असून अनेक जखमी झाल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठी नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’बांगलादेशमध्ये वाढणारी सांप्रदायिक हिंसा अत्यंत चिंताजनक आहे. धार्मिक छळापासून पळून जाणाऱ्या बांगलादेशी हिंदूंचे संरक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी सीएए मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. भारतीय मुस्लिमांना बांगलादेशी इस्लामवाद्यांशी बरोबरी करण्याचा कोणताही सांप्रदायिक प्रयत्न भारताने नाकारला पाहिजे.’
दरम्यान, यासंदर्भात बोलतांना भाजपा प्रवक्ते अमित मालवीय म्हणाले की,’बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात असून इथे सीएए या मानवतावादी कायद्याचे महत्त्व पुन्हा दर्शवत आहे. सीएएला ममता बॅनर्जींचा विरोध आणि आता बांगलादेश हिंसाचाराचवर त्यांचं मौन याची पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या हिंदूंना चिंता वाटली पाहिजे. ज्यांना तृणमुल सरकारमुळे अनेक समस्या आणि उपेक्षाला सामोरे जावे लागत आहे.’