रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नेहमी महाविकासाआघाडी सरकारवर टीका करत असतात. या ना त्या कारणाने ते नेहमी राज्यसरकारला कैचीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. आता देखील आरोग्य विभागाच्या कारभारावरून त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.
आरोग्य विभागाच्या सहा हजार पदांसाठी राज्यभरातून तीन ते चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या सर्व उमेदवारांना या नियोजनातील गोंधळाचा फटका बसला आहे. यापूर्वी आरोग्य विभागाची परीक्षा नियोजनातील गोंधळामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर २४ ऑक्टोबरला परिक्षा आयोजित करुनही आता या परिक्षेच्या नियोजनातही आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन दिसून आल्याचा आरोप खोत यांनी केला आहे.
‘२४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र देण्यात आले आहे. सर्वात विचित्र बाब म्हणजे सकाळच्या सत्रात होणारा पेपर एका जिल्ह्यात तर दुपारच्या सत्रात होणारा पेपर दुसऱ्या जिल्ह्यात असे परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. हा प्रकार लक्षात आल्याने परीक्षा पुढे ढकलूनही नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांनी तीव्र संताप केला आहे.
अशा परिस्थितीत उमेदवार एका जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावरुन दुसऱ्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर २-३ तासांत कसा पोहचणार, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. मला वाटतं की तुम्ही ठरवलं आहे, की जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ आणि अर्ध अर्ध वाटून खाऊ, म्हणत खोत यांनी राज्य सरकारला चिमटा काढला आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.