गुगल सर्च इंजिन हा अनेकांच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. कोणतीही माहिती हवी असेल तर गुगल सर्च अपरिहार्य. या सर्च इंजिनमध्ये आपण जो सर्च करतो त्याचे अनेक की वर्ड लगोलग खाली दिसतात हा अनुभव आहे. पण आर्यन खान सर्च करायला गेलात तर एकही ‘की वर्ड’ दिसत नसल्याचे नुकतेच लक्षात आले आहे. बॉलीवूड किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान अमली पदार्थ संबंधी आरोपावरून आर्थर रोड जेल मध्ये आहे. या हाय प्रोफाईल केस मध्ये आता राजकीय पक्षांनी सुद्धा उडी घेतल्याचे दिसून येत आहे.
शाहरुख कन्या सुहाना खान गुगलवर सर्च केले तर त्याखाली सुहाना चे जन्मतारीख, वय, इन्स्टा, फोटो, अपडेट, लुक, लाईफ असे अनेक की वर्ड दिसत आहेत मात्र आर्यनच्या बाबतीत बरोबर उलटा प्रकार आहे. यामुळे गुगल आणि शाहरुखची प्रसिद्धी टीम यांच्याकडे संशयाची सुई रोखली गेली आहे.
गुगल ट्रेंड्स मध्ये आर्यन संबंधी बेल, केस, एज, लेटेस्ट अपडेट असे की वर्ड सर्च होत आहेत. कोणताही की वर्ड दिला तरी गुगल सर्च मध्ये आर्यन बाबत एकही की वर्ड दिसत नाही. त्यामुळे आर्यनची माहिती गुगलने डिलीट केली की शाहरुखची प्रसिद्धी टीम ही माहिती मॅनेज करतेय या विषयी चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे युट्यूबवर सुद्धा हीच परिस्थिती असून की वर्ड सर्च केला की संबंधित एकही की वर्ड येत नाही असे दिसून येत आहे.