मागील काही दिवसांपासून ड्रग्जवरून राज्यात राजकारण सुरु असल्याचे दिसून येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईनंतर मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखडे व राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. त्यामुळे एका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर आरोप करत त्याचे खच्चीकरण करण्याचं काम या शासनातील मंत्री करत आहेत असा आरोप करत समीर वानखडेंच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान उतरली आहे.
सांगलीमध्ये आज समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने मोर्चा काढला असून यावेळी संस्थेचे पदाधिकारी असणाऱ्या नितीन चौगुले यांनी संस्थेची बाजू मांडताना नवाब मलिक यांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध आहेत का याची मागणी महाराष्ट्र सरकारने करावी अशी मागणी केली आहे.
नितीन चौगुले म्हणाले की, नवाब मलिकांसारखे जबाबदार मंत्री समीर वानखेडेंवर आरोप करत आहेत. त्यांच्यावर राजकीय आरोप केले तर समजू शकतो पण त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. त्यांच्या कुटुंबियांवर, वडिलांवर आणि बहिणीवर घाणेरडे आरोप केले. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इमानदार अधिकाऱ्याचं खच्चीकरण करण्याचं काम या शासनातील मंत्री करत आहेत.
पुढे बोलताना चौगुले म्हणाले, नवाब मलिक यांच्यासारखे मंत्र्यांच्या खात्याचा हा विषय नाही. असे असले तरी ते रोज उठून एखादी पत्रकार परिषद घेतात आणि त्यामधून उठसूट आरोप करतात. या माध्यमातून तपास भरकटवून ड्रग्ज माफियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात.
आम्हाला संशय आहे की त्यांचे जावई ज्या पदार्थाने अंमली पदार्थांच्या प्रकरणामध्ये सापडले. त्याप्रमाणे नवाब मलिक सुद्धा या ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आहेत की त्यांचे काही लागेबांधे आहेत की काय याचा तपास महाराष्ट्र शासनाने करावा असे मी आवाहन करतो.