सोशल मिडिया मधील दिग्गज आणि गेले काही दिवस सातत्याने वादात असलेल्या फेसबुकच्या नावात बदल केला जात असल्याची घोषणा गुरुवारी संस्थापक मार्क जुकेरबर्ग यांनी केली आहे. नवी कंपनी ‘मेटा’ या नावाने रीब्रांड केली जात असून नव्या लोगोसह असेल. ‘इन्फिनिटी’चे प्रतीक असलेला हा लोगो आहे.
मार्क झुकेरबर्गने नव्या मेटाची घोषणा करताना फेसबुक, इन्स्टाग्राम व अन्य अॅप्स तशीच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र हे सर्व प्लॅटफॉर्म ‘मेटा’ खाली येणार आहेत. मार्क म्हणाला नव्या अध्यायासह स्वतःच्या ओळखीबाबत विचार सुरु असून आमच्याकडे एक ‘मेटावर्स’ कंपनी म्हणून पहिले जाईल. मेटावर्सचा पुढचा प्रमुख सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असू शकतो आणि पुढच्या दहा वर्षात अनेक तंत्र कंपन्या याची निर्मिती करतील अशी आशा आहे. फेसबुक गेले काही दिवस सातत्याने गंभीर स्वरूपाचे आरोप झेलत आहे आणि विविध तपासाना सामोरे जात आहे म्हणून त्याचे नाव बदलले गेल्याचे सांगितले जात आहे.
व्हिसल ब्लोअर होगेन हिने फेसबुकची अंतर्गत कागदपत्रे उघड करून फेसबुक युजर्सच्या सुरक्षेपेक्षा नफा कमावण्यास अधिक प्राधान्य देत असल्याचे सिद्ध केले होते. त्यामुळे मेटावर्स हे गुगल प्रमाणे एक संघटन असेल असे समजते. २०१५ मध्ये गुगलने अल्फाबेटची स्थापना केली होती. मेटाचा कार्पोरेट पाया कायम राहणार असून अन्य सेवांच्या वापरासाठी फेसबुकची गरज राहणार नाही असेही सांगितले जात आहे. मेटावर्स हा शब्द प्रथम ३० वर्षापूर्वी एका कादंबरीत वापरला गेला होता. आता हा शब्द सिलिकॉन व्हॅली मध्ये चर्चेचा विषय झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार १ डिसेंबर पासून फेसबुक स्टॉकचा सिम्बॉल ‘एफबी’ ऐवजी ‘एमव्हीआरएस’ होणार आहे.