संस्थात्मक रचना ताब्यात घेऊन मनमानीपद्धतीने काम केले जात आहे. खऱ्या अर्थाने देशात लोकशाही राहिलेली नसून हुकूमशाही व्यवस्थेकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे, असे चित्र जगात निर्माण झाले आहे. पॅगेसीसच्या माध्यमातून हेरगिरी करून सर्वांची माहिती घेतली जात आहे, हे कोण करतेय याची चौकशी सरकार करत नाही. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, रशियातील केजीबीचा एक अधिकारी नंतर देशाचा पंतप्रधान झाला त्यानंतर राष्ट्राध्यक्ष झाला आणि आता आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष बनून रशियात एकाधिकारशाही आणली आहे भारताची वाटचालही रशियाच्या दिशेनेच सुरु आहे.
२३ कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना दारिद्र्याच्या खाईत लोटणाऱ्या केंद्र सरकारविरोधात ‘मोदी हटाव देश बचाव’ असा नारा आम्ही सायकल रॅलीच्या माध्यमातून देत आहोत. मनमोहनसिंग यांचे सरकार असताना १२४ डॉलर प्रति बॅरलप्रमाणे कच्च्या तेलाचे दर होते. सध्या कच्च्या तेलाचे दर ६० ते ६५ डॉलर प्रती बॅरल असे असतानाही पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकार सामान्य लोकांवर कर लादून स्वतःच्या झोळ्या भरण्याचं काम करत आहे, असा आरोपही चव्हाण यांनी मोदी सरकारवर केला.