केंद्र शासित प्रदेश असलेल्या दादरा आणि नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा फडकला! 7 वेळा खासदार राहिलेल्या मोहन डेलकर यांची पत्नी कलाबेन डेलकर यांनी लोकसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबर शिवसेनेनं प्रथमच महाराष्ट्राबाहेर लोकसभा निवडणुकीच्या विजयाची नोंद केली.
लोकसभेच्या रिक्त जागांसह विविध राज्यातील रिक्त विधानसभेच्या जागांचे निकाल आज लागले. महाराष्ट्राचं नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसह दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेलं होतं. खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे केंद्र शासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात निवडणूक झाली. याठिकाणी डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली होती.
कलाबेन डेलकर यांनी पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. 30 ऑक्टोबरसाठी मतदान झालं होतं. त्यांच्याविरोधात भाजपने महेश गावित यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी गावित यांचा पराभव केला. कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51 हजार मतांनी विजय मिळवला असून, भाजपला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे.
सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच कलाबेन पटेल यांनी आघाडी घेतली होती. भाजप उमेदवार महेश गावित सुरूवातीपासूनच पिछाडीवर होते. दुपारीनंतर कलाबेन पटेल यांनी 40 हजार मतांची आघाडी घेतल्यानंतर त्यांचा विजय निश्चित झाला होता. दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर संजय राऊत यांनी चलो दिल्ली असा हॅशटॅग वापरत एक ट्वीट केलं होतं.
मोहन डेलकरांनी केली होती आत्महत्या
1989 पासून आतापर्यंत मोहन डेलकर या लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. ते सातवेळा खासदार राहिले होते. दरम्यान, मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांनी दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावर आरोप केले होते.
.