न्यायाची लढाई नवाब मलिक हे लढत आहेत. संपूर्ण महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ते लढत आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. आमच्यासारख्या काही लोकांना वाटत होते की हे सगळे थांबावे, पण भाजपला जर शहाणपणा येत नसेल, तर ही लढाई सुरु राहिल. अजून काहीच समोर आलेले नाही. नवाब मलिक यांचा इंटरव्हल लांबतो आहे, मी एन्ट्री करणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादेत म्हटले आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, कधीही स्वत:चे हत्यार भाजप लढण्यासाठी वापरत नाहीत. स्वत:चे हत्यारच त्यांच्याकडे नाही. दुसऱ्याच्या खांद्यावर ते बंदूक ठेवतात. त्यांचे खांदेही पिचलेले असतात. खांदेही मजबूत नसतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक बार फुसका ठरतो. कधी बॉम्ब फोडणार म्हणतात, पण लवंगी फटाकाही फुटत नाही. कधी ईडी-सीबीआयच्या घोषणा करतात. पण तिथूनही काही मिळत नाही. भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरून आम्हाला विरोध केला जातो. शिवसेना हा एक हत्ती आहे. हत्ती चालत असतो. पण पाठीमागून कोण भुंकत असतो, त्याकडे लक्ष देण्याचे कारण नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
त्यांनी एसटी संपाबाबत बोलताना म्हटले की, फडणवीस मुख्यमंत्री असतानापासून एसटी कामगारांचा प्रश्न तापलेला आहे. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनीही मत व्यक्त केले आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर घोडे अडलेले आहे. अनिल परब यांनी अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. पण राज्यातील विरोधी पक्षाला महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची आहे.