बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. एका कार्यक्रमात तिने केलेल्या वक्तव्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. ‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले’, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. यावरून संपूर्ण देशातून तीव्र पडसाद उमटत आहे. यानंतर आता कंगना विरोधात विविध भागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंगना तिच्या अभिनयापेक्षा सध्या वादग्रस्त विधानामुळे अधिक चर्चेत असते. मात्र यामुळे अनेकदा तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. यातच आता तिच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कंगनानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या व्यक्तींनी बलिदान दिले त्यांचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जयपूर महिला कॉग्रेसच्या वतीनं याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजस्थानामधील चार शहरांमध्ये तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयपूरच्या सुखेर, जयपूर, जोधपूर आणि शास्त्रीनगरमध्ये कंगनावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.