देशाची राजधानी दिल्लीत वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्टाने दिल्ली दोन दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा, असे सुचविले आहे. दिल्लीत एक्यआय ५०० च्या वर गेल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. याची दखल घेत सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी नाराजी व्यक्त करत अशीच परिस्थिती राहिली तर लोकांना घरात मास्क घालून रहावे लागेल, केंद्र सरकारने लवकरात लवकर हवेच्या प्रदूषणावर मार्ग काढावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
मागील काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण वाढले आहे. त्यामुळे लोकांना श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. लोकांना घरातून बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. या प्रकरणाची दखल घेत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सरकारला धारेवर धरत काही प्रश्न विचारले. यावेळी सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी भाताची धसकटे जाळल्याने मोठ्या प्रमाणात धूर झाला. परिणामी वायूप्रदूषण वाढले आहे, असे सांगितले.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा म्हणाले, असेच जर सुरू राहिले तर लोकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल होईल. त्यांना घरातच मास्क घालून बसावे लागेल. तुम्ही काय करत आहात? असा प्रश्न विचारला. सॉलिसीटर जनरल मेहता यांनी उत्तर देताना सांगितले की, शेतकऱ्यांना धसकटे जाळ्यापासून रोखण्यासाठी काही नियमावाली तयार केली पाहिजे. राज्य सरकारने यावर कारवाई केली पाहिजे. यावर सरन्यायाधीश रमणा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, केवळ प्रदूषणासाठी शेतकरीच जबाबदार आहेत. असे असेल तर हे रोखण्यासाठी तुमच्याकडे काय उपाय आहे? कमी कालावधीतील योजना हे सगळे कसे रोखू शकतात?’, असा सवाल त्यांनी केला.
दिल्ली लॉकडाऊन : फटाके आणि उद्योगांच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
सरकारच्या स्पष्टीकरणावर बोलताना सरन्यायाधीश रमणा यांनी शेतकऱ्यांमुळे प्रदूषण होते यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, प्रदूषणात शेतकऱ्यांनी जाळलेल्या धसकटांचा हिस्सा असू शकतो. मात्र, दिल्लीत जे प्रदूषण होते त्यावर तुम्ही विचार करणार की नाही. दिल्लीमध्ये फटाके आणि उद्योगांमुळे वायू प्रदूषण होत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करा. गरज पडली तर दोन दिवस लॉकडाऊन करा. जर तुम्ही उपाय केले नाहीत तर लोक जिवंत कसे राहतील.
यावेळी न्यायमूर्ती चंद्रजूड यांनीही सरकारला धारेवर धरले, कोरोना महामारीनंतर शाळा सुरू केल्या आहेत. आम्ही मुलांना अशा पस्थितीत मोकळे सोडले आहे. डॉक्टर गुलेरिया यांनी दिेलेल्या अहवालानुसार, जेथे प्रदूषण जास्त आहे तेथे महामारी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सॉलिसीटर जनरल यांनी आज सरकार तातडीने बैठक घेणार असल्याचे सांगितले.