हिंगोली येथील काँग्रेसचे नेते, दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या (पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसच्यावतीने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तशी काँग्रेसने अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र सातव यांना राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, त्याच वेळी त्यांना विधान परिषदेवर पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तेव्हा कुठे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.
जिल्ह्यांत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण
हिगोली मतदारसंघातील काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्याठिकाणी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी विधान परिषदेचे तिकीट प्रज्ञा सातव यांना दिल्याचे प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले आहे.