येत्या काही काळात आता महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक येणार आहेत. या निवडणुकीत आघाडीतील पक्ष एकत्रित लढणार कि स्वतंत्रपणे लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. “राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असून तशा सूचनाही त्यांनी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना दिल्या आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवले असून त्यामध्ये काँग्रेसने महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा किल्लाही काँग्रेस एकट्याने लढवणार आहे.
राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा. आणि त्यादृष्टीने आतापासूनच प्रयत्न सुरु करावेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत स्थानिक पातळीवर परस्पर निर्णय घेऊ नयेत. कसल्याही तडजोडी करू नये, असे आदेश देण्यात आले असल्याचे पटोले यांनी सांगितले.