देशात सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची धास्ती आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये आतापर्यंत 5 ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढवली आहे.
यातच काल पुणे आणि पिंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने यावर आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी बूस्टर डोसबाबत यासंबंधी स्पष्ट भूमिका सांगितली आहे.
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे बूस्टर डोससंबंधी चर्चा सुरु आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंबंधी स्पष्ट भूमिका मांडली असून केंद्राला पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘कोरोना प्रतिबंधात्मक दोन डोस घेतलेल्या नागरिकांना देखील याची बाधा झाल्याचं दिसत आहे. तर मग बूस्टर डोसची गरज आहे का? आज आपल्याकडे डोस उपलब्ध आहेत. त्यासंबंधी देश पातळीवर निर्णय झाला पाहिजे. बुस्टर डोससंबंधी जी चर्चा सुरु आहे त्याबद्दल वेगवेगळा मतप्रवाह आहे. तो द्यायचा की नाही याबद्दल काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. त्यासंबंधी तज्ज्ञ व्यक्तीच सांगू शकतात’, अस मत अजित पवार यांनी व्यक्त केले.