दैनंदिन आहारात असलेला टोमॅटो आता काहीसा दिसेनासा होण्याची चिन्हे आहेत. देशभरात टोमॅटो दराचा भडका उडालाय. विशेषतः दक्षिण भारतात टोमॅटो दराने उच्चांक गाठलाय. मुसळधार पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे पुरवठा कमी झाल्याने दर भडकले आहेत. देशातील काही भागांत टोमॅटोचा दर प्रति किलो १२० रुपयांवर गेला आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
केरळमधील तिरुवनंतपूरम येथील बाजारात टोमॅटो १२० रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. तसेच बंगळूर येथे टोमॅटोच्या किमतीत प्रति किलोमागे ७० रुपयांची वाढ झाली आहे. पावसामुळे टोमॅटोसह फूलकोबी, कोंथिबीर, भेंडी, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे हा भाजीपाला कमी प्रमाणात बाजारात येत आहे.
तामिळनाडूतील चेन्नईत टोमॅटो प्रति किलो ९० रुपयांवर पोहोचला आहे.
महाराष्ट्रातील काही भागांत टोमॅटो १०० रुपये प्रति किलो विकला जात आहे. पावसामुळे टोमॅटो पीक खराब झाले असून त्याची वाहतूक करतानादेखील त्याचे नुकसान होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.