गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा कामावर परतले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक व वानखेडे यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. मुंबई ड्रग्स प्रकरणावरून त्यांच्यातील वाद सुरू झाले होते. तेव्हा पासून समीर वानखेडे कामावर नव्हते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी कामाला सुरुवात केली असल्याची माहिती समोर आली आहे.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणी प्रभाकर साईल नावाच्या एका पंचाने तर समीर वानखेडे यांनी शाहरुख खान याच्याकडून खंडणी उकळण्यासाठी ही कारवाई केल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्यामुळे वानखेडे अडचणीत आले होते. त्यानंतर एनसीबीने त्यांना दिल्लीला बोलावून त्यांची अंतर्गत चौकशीही केली होती. तेव्हापासून समीर वानखेडे बराच काळ दिल्लीत होते. मात्र आता प्रकरण जरा थंड झाले असल्याने वानखेडे यांनी पुन्हा कामाला सुरुवात करत मुंबई तीन ठिकाणी धाडी ताकत कारवाई देखील केली आहे.
कामावर परत आल्यावर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी एनसीबीच्या पथकाने मुंबईतील तीन ठिकाणांवर धाडी टाकल्या. यापैकी मुंबई विमानतळावर टाकण्यात आलेल्या धाडीत एमडी हे ड्रग्ज जप्त करण्यात आले. एनसीबीच्या पथकाला मुंबई विमानतळावरुन एक व्यक्ती ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.