साने गुरूजी जयंती निमित्त कार्यक्रम
नागपूर: लहानपणापासून साने गुरूजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना आपण म्हणत आहोत. पुढे बदलत्या काळानुसार या प्रार्थनेतील ओळींचा अर्थ कळू लागला. सर्वधर्माचा भाव हा मानव सेवा आहे. धर्म कुठलाही असो प्रत्येकाला आपले समजून त्यांच्याप्रती आपल्या दायित्वाचे निर्वहन करण्याचा संदेश साने गुरूजींच्या ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेतून येतो, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
साने गुरूजी यांच्या १२१व्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिका आणि सीनियर सिटीझन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रीक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शुक्रवारी (ता.२४) पंचशील टॉकीज चौकातील टिळक पत्रकार भवन सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, मनपाच्या गलिच्छ वस्ती व घरबांधणी समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, दुर्बल घटक समिती सभापती कांता रारोकर, स्वातंत्र्य संग्रामाच्या साक्षीदार लीलाताई चितळे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, सीनियर सिटीझन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रीक्टचे अध्यक्ष मनोहर खर्चे, उपाध्यक्ष मनोहर तांबुलकर, वसंत पाटील, सुरेश रेवतकर, वासुदेव वाकोडीकर, मनोहर तुपकरी, मधुकर पाठक, अनिल आकरे, भगवान टिचकुले, विजय दीक्षित, प्रमिला राउत, माधुरी भुजाडे, गीता महाकाळकर, प्रकाश इतलावतकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी यांनी साने गुरूजींच्या जीवन चरित्र्याचा गौरव केला. विपरीत परिस्थितीमध्ये साने गुरूजींनी ‘शामची आई’ हे पुस्तक लिहीले. ‘शामची आई’मधून प्रत्येक पिढ्यांना जीवनात करावयाच्या उत्तम कार्याची प्रेरणा मिळते. साने गुरूजींचा सन्मान करण्यासाठी सीनियर सिटीझन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रीकने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी अभिनंदनही केले.
नागपूर शहरातील आजच्या ज्येष्ठ नागरिकांनी विविध क्षेत्रातून आपला देश, राज्य आणि आपल्या शहराची सेवा केली. त्यांना आता कुठल्याही कामासाठी त्रास होउ नये या उद्देशाने त्यांच्या सहकार्यासाठी मनपा मुख्यालयात महापौर कार्यालयामध्ये ‘ज्येष्ठ नागरिक कक्ष’ स्थापन करण्यात आले आहे. आपल्या शहरासाठी आयुष्यभर सेवा देणा-यांना सन्मान देण्याचा प्रयत्न प्रत्येकवेळी मनपातर्फे करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.