एसटीचे विलिनीकरण होईल असं डोक्यातून काढून टाका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, यांचा परखडपणा सगळीकडे चालणार नाही, एसटीचे विलिनीकरण का होणार नाही ते त्यांनी सांगावं? असा सवाल अजित पवारांना केला आहे. आता अजित पवार काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रकांत पाटील महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हणाले, राज्य सरकार हे गेंड्यांच्या कातडिशीवाय भयानक झाले आहे. म्हाडा, आरोग्य टीईटी परीक्षेत मोठा भष्ट्राचार झाला आहे. यामध्ये सगळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत. या प्रकरणामध्ये अनेक मंत्री अडकण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला. सीबीआय चौकशीनंतर सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले. फोन टॅपिंगप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस हे योग्य वेळी कोर्टासमोर जातील असे त्यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले होते, एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीचा चेंडू हायकोर्टात आहे, हायकोर्टाच्या निर्देशावरुन विलिनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन झालेली आहे. त्या समितीने आपला अभ्यास सुरु केलेला आहे, त्या समितीने अभ्यासासाठी मुदतवाढ मागितली. समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल पण एसटी कामगार-कर्मचाऱ्याचं शासनात विलिनीकरण शक्य नाही.