आज दिनांक ६ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. याशिवाय, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही पंतप्रधान मोदींशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चुकीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत, उपराष्ट्रपती म्हणाले, सुरक्षा प्रोटोकॉल काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून भविष्यात अशा चुका पुन्हा होणार नाहीत, असेही ते म्हणाले.
याच मुद्द्यावर पंजाबमधील चन्नी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी चन्नी सरकारने उच्च स्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल तयार करेल. एका अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या समितीत निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव (गृह व्यवहार आणि न्याय) अनुराग वर्मा यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. येथे कारने हुसैनीवाला येथे जात असताना आणि हुसैनीवाला शहीद स्मारक 30 किलोमीटर अंतरावर असताना, एका पुलावर पंतप्रधानांचा ताफा पोहोचल्यानंतर शेतकरी आंदोलकांनी अचानकपणे रस्ता अडविला. जवळपास 15 ते 20 मिनिटे पंतप्रधानांचा ताफा अडविण्यात आला. यानंतर, हुसैनीवाला येथे जाणे रद्द करून पंतप्रधानांचा ताफा भटिंडा येथे परतला आणि भटिंडा येथून विमानाने पंतप्रधान दिल्लीला रवाना झाले होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल पंजाबमध्ये त्यांच्या दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटी संदर्भात माहिती घेतली. राष्ट्रपतींनी या गंभीर चुकीविषयी चिंता व्यक्त केली आहे, असे ट्विटरवरून आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणावर 7 जानेवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत पंजाब सरकारला योग्य निर्देश देऊन जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पुन्हा भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.