नागपूर: भारतीय स्त्री शक्ती संस्थेने महेश मांजरेकरांच्या ‘नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील अनेक आक्षेपार्ह गोष्टीवर आक्षेप घेतला असून, याचा ट्रेलर रिस्ट्रिक्टेड नसल्याने तसेच यात अल्पवयीन लैंगिक संबंधांमधे गुंतलेले, टोकाची हिंसा करतांना, अर्वाच्य शिव्या व अश्लिल भाषेचा वापर करतांना आणि जवळच्या महिला नातेवाईकाबरोबर अनैतिक संबंध ठेवतांना दाखवलं आहे. या ट्रेलरमधे या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे कुठले सर्टिफिकेट मिळाले आहे याची स्पष्टता नसल्याचे हर्षदा पुरेकर यांनी सांगितले. जर बीभत्स दृष्ये न काढल्यास आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. त्या आयोजित पत्र परिषदेत प्रसार माध्यंमाशी बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्यात की, हे कायद्याचे उल्लंघन तर आहेच पण त्याचबरोबर नैतिकतेच्याही सर्व मर्यादा ओलांडणारे आहे. यामुळे भारतीय स्त्री शक्ती, जी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारी देशव्यापी संघटना आहे. तिने याविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेऊन ही तक्रार सेन्सॉर बोर्ड, महिला व बाल कल्याण मंत्रालय, बाल हक आयोग, राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व प्रसारण मंत्रालय यांचेकडे पाठवली आहे. त्याचबरोबर सायबर सेल व पोलिसांनाही तक्रार देण्यात आली आहे.
भारतीय स्त्री शक्तीच्या वतीने बोलतांना राधिका देशपांडे यांनी माध्यमांना सांगितले की, या ट्रेलर मधील काकी ही स्वतःच्या पुतण्यास नको त्या गोष्टीस उत्तेजित करीत असल्याचे दाखवले आहे. एका दृश्यामध्ये अल्पवयीन मुलास एका अर्धनग्न महिलेसोबत अंघोळ करतानाचे बाथरूम मधील दृष्य दाखवले असून हे समाजातील विकृती आहे. सध्या लॉकडाऊन मुळे ऑनलाइन शाळा होत असल्यामुळे जवळपास सगळ्याच लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन आलेले असून ऑनलाईन शाळेसाठी इंटरनेट गरजेचे असल्यामुळे प्रत्येकाकडे इंटरनेट सुद्धा आहे. अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांचा सहभाग असलेला या प्रकारचा अश्लील ट्रेलर युट्युब या माध्यमावर टाकलेला असून हा व्हिडीओ पाहून अनेक लहान मुलांच्या बाल मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असून या दृश्यामुळे लहान मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास मदत होईल अशा त्या म्हणाल्या. याप्रसंगी पत्र परीषदेत हर्षादा पुरेकर, राधिका देशपांडे, डॉ मनिषा कोठेकर, निलम परवते व डॉ वासंती देशपांडे उपस्थित होत्या.
अखेर महेश मांजरेकर यांनी वादावर सोडले मौन
बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या वादासाठी नेहमी हटके आणि वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट करण्यासाठी ओळखले जाणारे महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट कारणीभूत ठरला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे चांगलीच चर्चा सुरु असून यावरुन विरोध दर्शवला जात आहे. याची दखल केंद्रीय तसेच राज्य महिला आयोगानेही घेतली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचा ट्रेलरही युट्यूबवरुन हटवण्यात आला आहे. दरम्यान या वादावर महेश मांजरेकर यांनी भाष्य केले आहे. टीकाकारांच्या टीकेवर माझा चित्रपटच बोलेल. ट्रेलर बघून टीका करणाऱ्यांना मी काय उत्तर देऊ? माझ्या नटसम्राट, भाईसारख्या चित्रपटांनाही विरोध झाला होता. स्लमडॉगसारख्या चित्रपटालाही विरोध झाला होता. पण नंतर तो चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमध्ये होता, असे महेश मांजरेकर म्हणाले आहेत.