अडचणीत होणार आणखी वाढ
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग एकदा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सांताक्रूझ पोलीस स्थानकामध्ये परमबीर सिंग यांच्यासह अन्य तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी आज लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह , माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, राधेश्याम मोपलवर आणि प्रदीप सिंह यांच्या विरोधात सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये साडेतीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी लेखी तक्रार देण्यात आली आहे. व्यवसायिक अनिल बाबूलाल वेदमेहता यांनी त्यांच्या वकिलामार्फत ही लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने सांताक्रूझ पोलीस स्टेशन चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तक्रारीतील माहितीनुसार व्यवसायिक अनिल बाबूलाल वेदमेहता त्यांच्यावर ठाण्यातील कळवा येथे एक तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर घटना ही 2017 मधील असून अनिल बाबूलाल वेदमेहता यांच्यावर MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जर MCOCA कारवाईमधून सुटका करायची बदल्यात 3.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली, असे तक्रारींमध्ये म्हटले आहे. आता या सर्व प्रकरणाचा तपास सांताक्रूझ पोलीस स्टेशन करणार आहे.
परमबीर सिंह यांच्यावर यापूर्वीही खंडणीचे आरोप –
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात यापूर्वीही खंडणी मागितल्या असल्याचा आरोप करण्यात आले होते. त्यानुसार गोरेगाव, मरीन लाईन या पोलीस स्थानकांमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रकरणे परमबीर सिंह यांची तब्बल 7 तास चौकशी देखील करण्यात आली होती. या प्रकरणात परमबीर सिंह यांना फरार देखील घोषित करण्यात आले होते.