नागपूर: व्यायाम प्रकारातील धावणे या प्रकाराचा एक शारिरीक क्षमता विकास टप्पा म्हणून मॅरेथॉन पूर्ण करण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी दिनांक 27 मार्चला नागपूर येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जवळपास दहा हजार लहान-मोठ्यांनी भाग घेतला. ही स्पर्धा कस्तुरचंद पार्क येथून सकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. दरवर्षी लोकमत तर्फे नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येते.
कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून स्थगीत झालेली ही स्पर्धा आता नागपुरात घेण्यात आली. या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत तीन किमी, पाच किमी, दहा किमी, 21 किमी असे टप्पे ठेवण्यात आले होते. भाग घेणाऱ्यास पदक, प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्यास रोख रक्कम तथा पदक बक्षीस म्हणून ठेवण्यात आले होते.बर्डी वरील माहेश्वरी हॉलमध्ये एक दिवसाआधीच मॅरेथान प्रदर्शनी (expo) ठेवण्यात आली होती.त्यात भाग घेणाऱ्यांना टी-शर्ट, बूट, मेडल,आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळी स्पर्धा सुरू झाली तेव्हा स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी ढोल-ताशांचा गजर करण्यात आला .झुंबा नृत्य ,पारंपारिक वेशभूषेत महिलांनी सर्वांचे स्वागत केले. जागोजागी पाणी, स्नॅक्स व्यवस्था केली होती. एकंदरीत वातावरण निर्मिती व सर्व व्यवस्था छान केली होती.
नागपूर येथील महापारेषण विभागातील सहाय्यक अभियंता कु. प्रीती उर्फ शुभांगी कापगते हिने ह्या स्पर्धेत भाग घेतला होता ही एक अतिशय सुंदर अनुभूती असल्याचे तिने सांगितले.दहा किमी धावण्याचा प्रवास तिने दीड तासात पूर्ण केला यात सर्व स्वेच्छेने धावतात,यात दुसऱ्यांशी स्पर्धा नसतेच, हार-जीत ही नसते तर स्वतःच्या शरीर सुदृढीकरणासाठी व स्वतःतील क्षमतेशीच शर्यत असते, म्हणून मनामध्ये आंतरिक प्रेरणा व तयारी असणे आवश्यक आहे असे तिने सांगितले.
यापूर्वीही तिने विभागीय खेळांमध्ये 50 हून जास्त पदक मिळवलेले आहेत. अशी ही लांब पल्ल्याची धावण्याची शर्यत नागपुरात अगदी आनंदी व उत्साही वातावरणात पार पडली. निरोगी तनमन ठेवणारं व आंतरिक क्षमता शक्ती वाढवणारं हे जणू विकसित शास्त्रच आहे. सर्वांच्या चेहर्यावर एक अलौकीक समाधान होते.