नवी दिल्ली: आयएनएएस स्क्वाड्रन 316 या भारतीय नौदलाच्या पी- 8आय विमानांच्या दुसऱ्या तुकडीचा आज नौदलाच्या ताफ्यात एका दिमाखदार सोहळ्यामध्ये समावेश करण्यात आला. गोव्यामध्ये आयएनएस हंसा येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नौदलप्रमुख ऍडमिरल आर हरीकुमार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाला संबोधित करताना आर हरीकुमार म्हणाले, “हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारत सर्वाधिक पसंतीचा सुरक्षाविषयक भागीदार आहे, ज्यातून आपल्या देशाची या प्रदेशातील प्रभावी सामरिक भूमिका प्रतिबिंबित होत आहे आणि या पल्ल्याचा आणखी विस्तार करण्याची गरज आहे. भारतीय नौदल यासाठी वचनबद्ध आहे आणि या उद्देशाचा पाठपुरावा करत आहे. आयएनएएस 316 चा ताफ्यात समावेश झाल्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा आणि टेहळणीमध्ये वाढ करण्याच्या दिशेने आणखी एक मोठा टप्पा आपण सर केला आहे.”