मुंबई : ईडीने पुन्हा एकदा मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध केला आहे. या कटामागचे देशमुख हेच ‘मास्टर माईंड’ असल्याचे ईडीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. देशमुखांच्या जामीन अर्जावर आज (शुक्रवारी) न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांवर प्रभाव टाकल्याचा आरोपही ईडीने केला आहे. देशमुख यांनी पदाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार केल्याचा दावा ईडीने केला आहे.
उच्च न्यायालयात ईडीच्यावतीने सहाय्यक संचालक तसिन सुलतान यांच्यावतीने ईडीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी उत्तरादाखल काल (गुरुवारी) 56 पानी प्रतिज्ञापत्र सादर केले. या मनी लॉन्ड्रिंगच्या कटामागचे देशमुख हेच मुख्य सूत्रधार आहेत. बेहिशेबी मालमत्ता जमवण्यासाठी त्यांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर अवाजवीपणे त्यांनी प्रभाव टाकल्याचेही यात नमूद केले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. राजकारणातील देशमुख हे एक प्रभावशाली व्यक्ती असल्यामुळे त्यांची सुटका झाल्यास ते साक्षीपुराव्यांशी छेडछाड करू शकतात. तसेच देशमुख हे तपासात सहकार्य करत नसल्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असेही ईडीने म्हटले आहे. याशिवाय देशमुखांपेक्षाही वयाने मोठे असलेले अनेक आरोपी जेलमध्ये असल्यामुळे वाढत्या वयाचा दाखला देऊन जामीन मागणे चुकीचे असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
देशमुखांनी भ्रष्टाचारातून मिळवलेल्या बेहिशेबी पैशातून कुटुंबातील सदस्यांच्या नावे विविध मालमत्ता तयार केल्या आहेत. त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे हे त्यांच्याच सूचनेवरून पोलीस अधिकाऱ्यांची नावे असलेल्या अधिकृत याद्या पोस्टिंगसाठी अनुकूल आणून देत असत. तत्कालीन गृहमंत्र्यांच्या कार्यालयात कॅबिनेट मंत्र्याशी सल्लामसलत करूनच मुंबई शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील याद्याही तयार करण्यात आल्या होत्या. त्या याद्या पालांडे आणि रवी व्हटकर यांच्यामार्फत पोलीस आयुक्तांकडे सोपवण्यात आल्याचेही यात म्हटले आहे.