नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 28 एप्रिल रोजी आसामला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला पंतप्रधान आंगलाँग जिल्ह्यातल्या दिफू येथे ‘शांतता, एकता आणि विकास’ मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
भारत सरकार आणि आसाम सरकारने कारबी अतिरेकी संघटनांबरोबर अलिकडेच सहा ‘मेमोरंडम ऑफ सेटलमेंट (एमओएस) केले. यामुळे या प्रदेशात शांततेच्या नवीन युगाला प्रारंभ झाला आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शांतता, एकता आणि विकास’ मेळाव्यामध्ये पंतप्रधान मार्गदर्शनपर भाषण करणार असून त्यामुळे इथे राबविण्यात येत असलेल्या शांतता उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.
या दौ-यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते दिफू येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय, पश्चिम कारबी आंगलाँग येथे पदवी महाविद्यालय आणि कोलोंगा पश्चिम कारबी आंगलाँग येथे कृषी महाविद्यालयाची पायाभरणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पांसाठी 500 कोटींपेक्षाही जास्त खर्च अपेक्षित आहे.
या प्रकल्पांमुळे राज्यात कौशल्य आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते अमृत सरोवर प्रकल्पांचा शिलान्यासही करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 1150 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.