विद्यार्थी नियतकालिक ‘कॅम्पस’ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
नागपूर: रा. तु. म. नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात आज ‘बॅक टू कॅम्पस’ हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मा. कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या आयोजनाला महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर व अमरावती विभागाचे संचालक श्री. हेमराज बागुल प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
ऑफलाइन वर्ग परत सुरु झाल्याने सहशिक्षणाचा आनंद विदयार्थ्यांना लुटता येतो आहे. वर्गात परतीचा जल्लोष साजरा करण्यासाठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विभागाचे ‘कॅम्पस’ हे नियतकालिक विद्यार्थ्यांच्या संपादकीय सहभागातून निर्माण करण्यात येते. मान्यवरांच्या हस्ते ‘कॅम्पस’ चे प्रकाशन करण्यात आले. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्री. बागुल यांनी स्वतःच्या विद्यार्थिजीवनाच्या आठवनींना उजाळा दिला. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना भविष्यात समाजमनाचा आवाज होऊन समाजाचे बौद्धिक नेतृत्व करावयाचे असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण सजगतेची रुजवण आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
समाजाला एकाएकी न रुचणाऱ्या प्रबोधनपर गोष्टी ‘अल्गोरिथम’ वर चालणारा बाजाराधिष्टित सोशल मीडिया मांडणार नाही. उलट बेवारस माहित्या समाजात पोचून आपण कळत नकळत त्याचे बळी पडतो आहोत. सृजन ओहोटीला लागलंय, अभिरुचीचा दर्जा खालावत चाललाय आणि समाजात साचेबंदपणा वाढत चाललाय. या परिस्थितीत समाजाची अपेक्षित असलेली सुदृढ जळणघडण व्हायची असेल तर पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी बहुश्रुत होऊन समाजमनाला साद घालण्याची नैतिक जबाबदारी घ्यावी, असे श्री. बागुल म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात मा. कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी माध्यमांचे महत्व अधोरेखित करताना मार्मिक विचार मांडला की, भविष्यात प्रसामाध्यमांवर पक्की मांड असलेल्या व्यक्ती वा संस्थाच पाहिजे तो विचार रुजवून समाजाची दिशा ठरवतील. ज्ञानाचे संवर्धन व त्याचा प्रसार हेच ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेच्या निर्मितीचे पहिले पाऊल होय. वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोचवणे व ती समजावून सांगणे, सांगोपांग जागरूकता व त्यातून विचारशीलता निर्माण करणे हे माध्यमांचे कार्य आहे. या राष्ट्रकार्यासाठी उपयुक्त असे विद्यार्थी जनसंवाद विभागातून तयार होत राहतील, असा आशावाद मा. कुलगुरूंनी व्यक्त केला.
विभागाचे माजी विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होते. कोरोनाकाळात जिल्हा माहिती कार्यालयाने पार पाडलेल्या जबाबदारीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी उचललेला खारीचा वाटा व त्यातून लाभलेले अमुल्य समाधान माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. विभागाचे विद्यार्थी कर्नल रोहित ओबेरॉय यांनी गेल्या एका वर्षात विभागाद्वारे पार पाडलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. पत्रकारितेच्या व्रताला अधिक संपन्न करणारे तसेच समाज व देशाला आपण काही देणे लागतो याची जाण असलेले असे विद्यार्थी या विभागातून निपजतील अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
विभागप्रमुख डॉ मोईज मन्नान हक यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी वर्णनात्मक ऑफलाइन परीक्षा सुद्धा अभिव्यक्तीचेच माध्यम असल्याची त्यांची शाब्दिक कोटी श्रोत्यांची दाद मिळवून गेली. याप्रसंगी विभागाचे शिक्षकगण व विद्यार्थी उपस्थित होते.