नागपूर: देशातील काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२,८४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७,९८५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ६३,०६३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनाने ५ लाख २४ हजार ८१७ रुग्णांचा बळी घेतला आहे. चितेंची बाब म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी १२ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे तब्बल १११ दिवसांनी बुधवारी दिवसभरात १२ हजार २१३ कोरोनारुग्णांची भर पडली होती. तर, ११ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता.
दरम्यान, ७ हजार ६२४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. होता गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.६५ टक्के नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर २.३५ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर २.३८ टक्के नोंदवण्यात आला होता.
देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९५ कोटी ८४ लाख ३ हजार ४७१ डोस देण्यात आले आहेत. यातील ३.५४ कोटी पहिला डोस १२ ते ४४ वयोगटातील बालकांना देण्यात आला आहे. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत ४ कोटी १ लाख ४६ हजार ३८७ बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १३ कोटी २८ लाख ७५ हजार ४५५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात बुधवारी दिवसभरात ५ लाख १९ हजार ४१९ तपासण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण ८५ कोटी ६३ लाख ९० हजार ४४९ तपासण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
नागपुरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आले आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा नवा व्हेरिएंट असलेल्या बीए-५ (BA 5) प्रकारचे दोन रुग्ण आढळले आहेत. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (नीरी) प्रयोगशाळेतील जनुकीय चाचणीत हा नवीन विषाणूचा प्रकार आढळून आला आहे.
बीए-५ विषाणूची बाधा झालेल्या दोन्ही रूग्णांचा बाहेरगावच्या प्रवासाचा इतिहास आहे. यातील २९ वर्षीय पुरुष हा केरळहून ४ जूनला नागपुरात आला होता, तर दुसरी ५४ वर्षीय महिला ही मुंबईहून ६ जूनला नागपुरात परतली होती. दोघांनाही सर्दी, खोकला, तापसह इतर लक्षणे असल्याने त्यांनी करोना चाचणी केली. त्यांना कोरोनाचे निदान झाल्यावर त्यांचे नमुने महापालिकेने जनुकीय चाचणीसाठी नीरीच्या प्रयोगशाळेत पाठवले होते.
या दोन्ही रुग्णांना कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोन्ही रुग्णाची माहिती घेतली असता त्यांचे लसीकरण झाले होते.
सध्या त्यांना एकही लक्षणे नसून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आहे.
खबरदारी म्हणून दोघांना विलगीकरणात राहाण्याच्या सूचना करण्यात आली आहे.