नागपूर: राज्यात मागील काही दिवसांपासून मोठा राजकीय सत्तासंघर्ष सुरु होता. या सत्तासंघर्षात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी स्वपक्षाविरोधातच बंड पुकारलं होत. यानंतर शिवसेनेला मात्र धक्क्यांवर धक्के बसत आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली.
मात्र उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या राज्यभरातील जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त संदीप इटकेलवार अनुपस्थित होते. तेही शिंदे गटात जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यानंतर आता विदर्भातही सेनेला सौम्य धक्के बसू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी झाले गेले विसरून नव्याने सेना उभारण्याचा संकल्प केला आहे.
दरम्यान, कालच्या बैठकीत लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.